बहुजननामा ऑनलाईन – परंपरेप्रमाणे पार्थिवाला खांदा देण्याचे काम हे पुरुष मंडळी करत असतात. मात्र या परंपरेला मोडत बीड मध्ये चार महिलांनी पार्थिवाला खांदा दिला आहे.या चार महिलांनी आपल्या सासूच्या पार्थिवाला खांदा देत नवीन पायंडा पाडला आहे. सासू- सिनेचा संबंध कसे असतात हे आपल्याला माहित आहे. कधी कधी तर त्यांची भांडणे हे चक्क पोलीस स्टेशन सुद्धा गाठलेले आपण पाहिले आहे. बीडमधील काशिनाथ नगरमध्ये राहणाऱ्या सुंदरबाई दगडू नाईकवाडे यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आली असता घरातील चारही सुनांनी खांदा देत एक नवीन आदर्श घडवला आहे.
आपल्या समाजात सासू सुनांचे नाते म्हणजे फक्त आणि फक्त भांडणे असा असतो हा गैरसमज दूर करत बीडमधील या सुनांनी नवीन पायंडा पाडला आहे. बीडमध्ये केवळ या घटनेमुळे या सुनांची चर्चा झालेली नाही तर याआधीही यांच्या एकजुटीमुळे त्या नेहमी चर्चेत असतात. कोणताही सण असला तरी त्या मोठ्या आनंदाने एकत्रितपणे साजरा करतात.
मनिषा जालिंदर नाईकवाडे, मीना मच्छिंद्र नाईकवाडे, लता नवनाथ नाईकवाडे, उषा राधाकिसन नाईकवाडे अशी या चार सुनांची नावे आहेत. या कृत्याने या चारही सुनांनी एक नवीन आदर्श घालून दिला असून, यापुढे अनेक सुना त्यांच्या या कृत्याचे अनुकरण करतील अशी आशा आहे.