चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन – चंद्रपूर जिल्हा बावणे कुणबी समाज मंडळाच्या वतीने समाजाचा स्नेहमिलन सोहळा व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन २० जानेवारीला स्थानिक जगन्नाथबाबा मठ येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र लांजेवार, सचिव प्रशांत गोमाशे, कोषाध्यक्ष भाऊराव कुकडे, सहसचिव आसाराम राघोर्ते, उपाध्यक्ष भागवत शेंडे, ज्योती चौधरी, सहसचिव अशोक चौधरी, प्रसिद्धिप्रमुख सौरभ निंबार्ते यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बावणे कुणबी समाज मंडळाचे माजी उपाध्यक्ष ॲड. प्रभाकर तितरमारे, उद्घाटक म्हणून नागपूरच्या प्रा. डॉ. कविता मते, तर प्रमुख अतिथी म्हणून बावणे कुणबी समाज मंडळ कोराडी-खापरखेडाचे अध्यक्ष मधुकर ठवकर, वर्धेचे जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, ब्रह्मपुरीचे सुधीर सेलोकर, विशेष सत्कारमूर्ती खासदार मधुकर कुकडे, विशेष समाज गौरव पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू रजत सेलोकर उपस्थित राहतील.
कार्यक्रमादरम्यान, स्नेहमिलन सोहळा, समाजभूषण पुरस्कार, ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वधू-वर परिचय मेळावा, दिनदर्शिका प्रकाशन, विशेष समाज गौरव पुरस्कार आदी कार्यक्रमासह रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.