नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुटखा खाण्यापासून रोखलं म्हणून एका तरुणाने आपल्या पत्नीवर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात हा प्रकार घडला आहे. पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
सहा महिन्यांपूर्वी हस्तिनापूरच्या रणवीर सिंह यांच्या मुलीचे गणेशपूर गावातील नेत्रपाल यांचा मुलगा लोकेश याच्यासोबत लग्न झालेलं. लोकेशला दारु आणि गुटख्याचे व्यसन होते. तर काजल त्याच्या व्यसनाला वैतागलेली. लग्नाच्या काही दिवसानंतर तिला लोकेशच्या गुटख्याच्या व्यसनाबाबत माहिती झालेली. ती त्याला सतत गुटखा खाण्यापासून रोखायची. म्हणून सुरुवातीस त्यांच्यात खटके उडत होते. त्यानंतर गुटखा खाण्यावरुन दररोज भांडण होऊ लागली.
दरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सुमारास गुटखा खाऊन लोकेश घरी आला. त्यास पाहून पत्नीला राग अनावर झाला आणि तिने त्यास हटकले. त्यामुळे रागाच्या भरात लोकेशन पिस्तुलातून पत्नी काजलवर गोळ्या झाडल्या. यामुळे परिसरात खळबळ उडाली. कुटूंबीयांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती चितांजनक आहे. या प्रकरणी कालजच्या वडिलांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी लोकेशला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.