नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची दिग्ग्ज टेनिसपटू सानिया मिर्झानंतर आता देशाची आणखी एक मुलगी पाकिस्तानी क्रिकेटरची वधू बनणार आहे. हरियाणामधील नूंहची रहिवासी असणारी शामिया आरजू पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. ज्याची जोरदार तयारी सुरु आहे. हे लग्न पुढील महिन्यात 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. शामिया एअर अमीरात मध्ये फ्लाईट इंजिनियर आहे.
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात जन्मलेला हसन अली आणि नूंहच्या चंदेनी मधील निवासी शामिया यांचं लग्न दुबईतील ऐटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये होणार आहे.
17 ऑगस्ट रोजी कुटुंब दुबईसाठी रवाना होणार
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शामियाच्या कुटुंबातील जवळपास 10 सदस्य 17 ऑगस्ट रोजी दुबईला जाणार आहे. तिचे वडिल माजी बीडीपीओ लियाकत अली म्हणाले की, “मुलीचं लग्न करायचं आहे. भारत असो वा पाकिस्तान काही फरक पडत नाही. फाळणी झाल्यानंतर माझे अनेक नातेवाईक पाकिस्तानात गेले होते.”
असं पक्क झालं शामियाचं नातं
शामियाचं नातं तिच्या पंजोबाच्या कुटुंबाद्वारे ठरवण्यात आलं आहे. लियाकत अली यांनी सांगितलं की, पाकिस्तानातील माजी खासदार आणि पाकिस्तान रेल्वे बोर्डाचे चेअरमन असलेले सरदार तुफैल आणि त्यांचे आजोबा हे सख्खे भाऊ होते. फाळणीनंतर त्यांचे आजोबा इथेच राहिले तर त्यांचे भाऊ पाकिस्तानात गेले. त्यांचे कुटुंब आज पाकिस्तानातील कसूर जिल्ह्यातील कच्ची कोठी नईयाकी मध्ये रहात आहे. यांच्याद्वरेच स्थळ पक्क करण्यात आलं आहे. शामियाने मानव रचना युनिव्हर्सिटीमधून ऐरोनॉटीकल इंजिनियरींगमध्ये बीटेक केलं आहे. याआधी ती जेट एअरवेजमध्ये होती. परंतु गेल्या तीन वर्षांपासून ती एअर अमीरातमध्ये काम करत आहे.