ठाणेः बहुजननामा ऑनलाइन टीम – एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (Unified DCPR) ही सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून तयार केली आहे. सामान्य माणसाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, हा ध्यास त्यामागे आहे. परंतु, नियम चांगले असून उपयोग नाही, तर त्याची अंमलबजावणीही तितक्याच काटेकोरपणे व प्रभावीपणे झाली पाहिजे. ती जबाबदारी तुमची असल्यामुळे ही नियमावली(Creation of Unified DCPR) योग्य रितीने समजून घेऊन त्याची अंमलबजावणी करा, असे प्रतिपादन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 11) येथे केले.
राज्य सरकारने अलिकडेच मंजूर केलेल्या युनिफाईड डीसीपीआर संदर्भात नगरविकास विभागातील तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन नगरविकास मंत्री शिंदे यांच्या हस्ते येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाले. यावळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जीतेंद्र आव्हाड आणि नगरविकास विभाग 1 चे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.
यावेळी शिंदे म्हणाले की, एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली सर्वसामान्य व्यक्तीचे हित डोळ्यासमोर ठेवून बनवली आहे. यामुळे हाऊसिंग स्टॉक वाढून घराच्या किमती आवाक्यात येतील. 150 चौ. मी. पर्यंतच्या भूखंडावर स्ववापरासाठी घर बांधणाऱ्या व्यक्तीला बांधकाम परवान्याची आवश्यकता रद्द करण्याची तरतूद यात केली आहे. तसेच पर्यटन आणि कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या तरतुदीही यात असल्याचे शिंदे म्हणाले.
क्लस्टर डेव्हलपमेंट, तसेच एसआरए योजना राज्यभरात लागू केल्याने धोकादायक, तसेच बेकायदा इमारती व झोपडपट्टयांमध्ये जीव मुठीत धरून राहणाऱ्या लाखो लोकांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीच्या पहिल्या सरकारच्या वेळी 40 लाख झोपडीवासीयांना हक्काची घरे देण्याची घोषणा केली होती. बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एसआरएशी निगडित किचकट नियमांचे सुलभीकरण केले असल्याचेही ते म्हणाले. प्रत्येक शहरासाठी स्वतंत्र नियमावली असण्याऐवजी एकाच पुस्तकात तुम्ही अवघा महाराष्ट्र सामावला, त्याबद्दल तुमचे खास अभिनंदन अशा शब्दांत आव्हाड यांनी या युनिफाइड डीसीपीआरचे स्वागत केले