नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसची सगळीकडे दहशत असून आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तीचा शोध घेतला असताना त्या व्यक्तीमुळे कोरोना पसरल्याचे बोलले जात आहे. या व्यक्तीचे नाव स्टीव्ह वाल्श असून त्याचे वय ५३ वर्षे आहे. तो एक व्यावसायिक असून त्याच्यावर आता लंडनमधल्या एका रुग्णलयात उपचार सुरु आहेत. स्टीव्ह हे पूर्णपणे बरे झाले असले तरी त्यांच्यामुळेच कोरोना अनेक देशांमध्ये पोहोचला आहे.
स्टीव्ह वाल्श हे जानेवारीमध्ये ब्रिटनमध्ये गॅस अनॅलिटीक्स कंपनी सर्वोमॅक्सच्या विक्री परिषदेला गेले असताना त्यांना तिकडेच कोरोनाची लागण झाली, असल्याचे समजते. तसेच या परिषदेला उपस्थित असलेल्या चिनी शिष्टमंडळाकडून कोरोना पसरला असल्याची शक्यता दर्शवली जात असताना त्यांची वैद्यकीय चाचणी निगेटिव्ह आल्याचे सर्वोमॅक्सने सांगितले.नंतर सर्वोमॅक्सने स्टीव्ह यांचा फोटो प्रसिद्ध करत त्यांना त्यांच्या माध्यमातून कोरोना इतर देशात पसरल्याने त्यांना ‘सुपर स्प्रेडर’ म्हटले आहे.
या विक्री परिषदेला एका आलिशान हॉटेलमध्ये १०९ प्रतिनिधी आले होते. तिथे काही चिनी नृत्यांगनांनी नृत्य सादर केले. दरम्यान स्टीव्ह यांना कोरोना झाला असल्याची जराही जाणीव नव्हती. त्या परिषदेनंतर मलेशियाला आलेल्या एका व्यक्तीच्या शरीरात कोरोना विषाणू आढळून आला. नंतर परिषदेला उपस्थित असलेल्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवले गेले. तो पर्यंत १०९ मधल्या ९४ जण त्यांच्या देशात परतले असताना कोरोना पसरत गेला. परिषदेनंतर स्टीव्ह हे आपल्या पत्नीसह फ्रान्समध्ये सुट्टीसाठी गेले. त्यांच्या संपर्कात आलेल्या चार मित्रांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. फ्रान्समध्ये त्यांच्यासोबत त्यांचे पाच मित्र होते. त्यांच्याही शरीरात कोरोनाने प्रवेश केला. नंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तसेच स्टीव्ह यांच्यामुळे एका स्पॅनिश नागरिकालाही कोरोना व्हायरस झाला. स्टीव्ह यांच्यामुळे ११ जणांना कोरोना झाला असल्याचे समोर आले आहे.