पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले असले तरी देखील सोशल डिस्टेन्सिंगचा फज्जा उडताना आपणास पहावयास मिळत आहे. दरम्यान, पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 1 हजार 504 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात शहरात 7 जणांचा मृत्यू झाला असून पुण्याबाहेरील 6 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. दिवसभरात 675 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात सध्या कोरोनाचे 357 क्रिटिकल रूग्ण असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता तब्बल 2 लाख 13 हजार 25 वर गेली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 99 हजार 567 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 8 हजार 541 एवढी आहे. आतापर्यंत शहरात कोरोनामुळं 4 हजार 917 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आज तब्बल 8 हजार 553 तपासण्या (स्वॅब) करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.