या महिलेचे नाव जेस मार्चबँक आहे. ती यूकेची रहिवासी असून व्यवसायाने नर्स आहे आणि दोन मुलांची आई देखील आहे. तिला कोरोना महामारीच्या सुरुवातीलाच लागण झाली होती. मार्चमध्ये फक्त ३ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर तिला घरी जाण्याची परवानगी दिली गेली होती.
मार्चपासून जेस घरी असूनही पूर्णपणे बरी होऊ शकली नाही. आता ती लोकांना चेतावणी देत कोरोनाच्या दीर्घकालीन दुष्परिणामांबद्दल सांगत आहे. ती म्हणाली- ‘मला खरोखर असे जाणवत नाही कि मी जगत आहे. थकव्यामुळे शारीरिकरित्या मी काहीही करू शकत नाही.’ जेसला श्वास घेण्यासही त्रास होतो.
तज्ञ डॉक्टरांना अजूनही समजू शकलेले नाही की, कोरोना व्हायरसमुळे किती काळ लोकांवर दुष्परिणाम होऊ शकतात. सध्या जेस हृदयरोगतज्ञांना भेटत आहे आणि तिचे परीक्षण केले जात आहे.
मात्र कोरोना व्हायरसने कित्येक महिन्यांपासून आजारी असलेली जेस एकटीच नाही. ब्रिटनमधील अभ्यासात असे दिसून आले आहे की, असे हजारो लोक आहेत ज्यांच्यात तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ कोरोना विषाणूची लक्षणे आढळली. मात्र एकंदरीत पाहिले तर तज्ञ आतापर्यंत अशा रूग्णांकडे कमी लक्ष देऊ शकले आहेत, कारण अधिक संशोधन कोरोनापासून जीव वाचवणे आणि लसीबाबत केले जात आहे.