मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सध्या देशात कोरोनाबाबत सगळीकडे भीतीचे वातावरण असून शक्य होईल तेवढी काळजी घेतली जात आहे. तसेच मुंबईमध्ये प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी भाविकांना प्रवेशही बंद करण्यात आला आहे.
दोनच दिवसांपूर्वी मंदिराचे अध्यक्ष आदश बांदेकर यांनी मंदिरामध्ये येणाऱ्या सगळ्या भाविकांना सॅनिटायझर दिले. तसेच हात निर्जंतुक केल्यानंतरच मंदिरात प्रवेश देण्यात येईल, असे जाहीर केले होते. पण आज मंदिराचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पत्रक मंदिराच्या ट्रस्टने प्रसिद्ध केले आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून देशात संक्रमित लोकांचाही संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे, गर्दीच्या ठिकाणी ना जाणे, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, तसेच मंदिराचे भाविकांबद्दल असलेले सामाजिक दायित्व लक्षात न घेता भाविकांसाठी श्री सिद्धीविनायक गणपतीचे दर्शन पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय न्यास व्यवस्थापन समितीने घेतला आहे. पण न्यासातर्फे देण्यात येणारी वैद्यकीय मदत, मदत कक्ष रुग्णांसाठी सुरु राहणार असल्याचेही मंदिर प्रशासनाने जाहीर केले आहे.