पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. पुण्यात वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने बेडची संख्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, बेडची संख्या वाढवली तरी आरोग्य कर्मचारी,डॉक्टर आणणार कोठून असा प्रश्न उपस्थित झाला. यावर तोडगा काढताना अजित पवार यांनी सर्व शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एमबीबीएस, पीजीच्या व नर्सिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याना त्वरीत ड्युटीवर बोलावून घेऊन ही मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्याचे आदेश दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी अजित पवार यांनी हे आदेश दिले.
यावेळी पुण्याचे महापौर, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्यासह इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील ऑगस्ट अखेरची स्थिती विचारात घेत गतीने नियोजन करावे लागणार आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सोबतच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगत कोरोना प्रतिबंधक तातडीच्या उपाय योजनांसाठी तसेच मंत्रालयस्तरावरील प्रश्न मार्गी लावले जातील.
खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवा
खासगी दवाखान्यातून कोरोना उपचारासाठी मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत खासगी रुग्णालयाचे बिल स्वातंत्र लेखा परीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील. शासनाच्या नियमानुसार उपचारांचे दर आकरणी केली आहे की नाही याची शहानिशा करुनच रुग्णाला बिल दिले जावे, याबाबत संबंधित यंत्रणेने दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.