बहुजननामा ऑनलाइन टीम – जगभरात थैमान घातलेल्या कोरोनावर लस आल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही अद्याप धोका टळला नाही, असा इशारा शास्त्रज्ञ, डॉक्टर्स देत आहेत. त्याबद्दल संशोधनही जगभरात विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सुरू आहे. अशातच अमेरिकेतील एका संशोधनानुसार कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या मेंदूमध्ये कोरोना लपून बसतो, असे दिसून आले आहे.
कोरोनाची बाधा झाल्यानंतर काही व्यक्ती बऱ्या होतात, मात्र बऱ्याच काळानंतर त्यांचा मृत्यू होतो किंवा काही ना काही शारीरिक किंवा मानसिक व्याधी त्यांना जडत असतात, असे दिसून आले आहे. यामागे कोरोना विषाणू मेंदूत राहिलेला असल्याचे एक कारण असू शकते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. अर्थात संसर्ग झालेल्या प्रत्येकाच्याच मेंदूवर कोरोनाचा दुष्परिणाम होतो, असे नाही. पण कोरोना आपल्या शरीरातून गेला असे त्यांना वाटत असले तरी तो त्यांच्या मेंदूत घर करून राहू शकतो. अमेरिकेतील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार कोरोना विषाणू मानवी मेंदूत वास्तव्य करू शकतो. असे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे.
जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ आणि असिस्टंट प्रोफेसर मुकेश कुमार यांनी कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका उंदरावर या गोष्टीचे निरीक्षण नोंदवल आहे. या उंदराला अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधी जडल्या. त्या उंदराला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर पाच ते सहा दिवसांतच विषाणू उंदराच्या मेंदूत जाऊन लपला. त्याच्या फुप्फुसांमधल्या कोरोना विषाणूंची संख्या मात्र तिसऱ्या दिवशीपासूनच घटू लागली होती. याचाच अर्थ असा, की कोरोना आता फुप्फुसांच्या ऐवजी शरीराच्या सर्वांत महत्त्वाच्या अवयवांकडे आपला मोर्चा वळवत आहे. मेंदूत असलेल्या कोरोना विषाणूंची संख्या शरीरात अन्यत्र असलेल्या विषाणूंच्या तुलनेत एक हजार पटींनी अधिक होती, ही चिंताजनक बाब असल्याचेही शास्त्रज्ञ म्हणाले.
मुकेश कुमार म्हणाले की, कोरोना झाल्यानंतर काहीं व्यक्तींना हृदयविकार होतो, काहींची वास घेण्याची, चव घेण्याची क्षमता नष्ट होते अशी लक्षणे दिसून आली आहेत. या लक्षणांच फुप्फुसांशी काही देणं-घेण नाही. त्याचा संबंध थेट मेंदूशी आहे. मेंदू ही एकमेव अशी जागा आहे त्याबद्दल माणसांना अद्याप सखोल माहिती नाही. त्यामुळे त्या जागी घर करण कोरोनाला सोपे जाते. त्यामुळे कोरोना हा केवळ श्वसनयंत्रणेशी निगडित विकार आहे, असा विचार करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.