बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असुन हर्षवर्धन पाटील हे उद्या बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी ठीक तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे उपस्थितीत भाजपात प्रवेश करणात असल्याची माहीती हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे बोलताना दिली. हर्षवर्धन पाटलांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला पश्चिम महाराष्टातील इंदापूर तालुक्यातुन मोठा धक्का बसला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजपच्या मान्यवर नेत्यांच्या उपस्थित हा प्रवेश सोहळा होणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाने राज्यातील काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्यातील सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.तर साखर क्षेत्रातील जाणकार नेता म्हणूनही त्यांची चांगली ओळख आहे. इंदापूर विधानसभा मतदार संघांचे त्यांनी सलग 4 वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.
यामध्ये सलग 3 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा राज्यात विक्रम हर्षवर्धन पाटील यांनी केलेला आहे. त्यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात 5 वर्षे व त्यानंतर आघाडी शासनात सलग 14 वर्षे मंत्री म्हणून उत्कृष्ठपणे काम केले आहे. त्यांनी एकूण 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे. राज्यातील जेष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे.इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील हे नाराज होते. इंदापूरच्या गाजलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशाची मागणी केली होती. इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.