नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेस आणि भाजपचा अल्पसंख्यांकांकडे बघण्याचा दृष्टीकोनामध्ये काहीही फरक नसल्याचे बसपा नेत्या मायावती यांनी म्हटले आहे. काँग्रेस शासित मध्यप्रदेशात मुस्लिम युवकांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा नोंदवला जाण्यावर आणि उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यावरही त्यांनी टीका केली.
मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यांमधील उदाहरणे हि अल्पसंख्यांकांच्या मनात दहशत पसरवणारी आहेत. आणि ते निषेधार्ह आहेत, असे मायावती म्हणाल्या.मंगळवारी देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल अलिगड मुस्लिम विद्यापिठातील 14 विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर मध्यप्रदेशात खांडवा इथे गोहत्या केल्याबद्दल तीन मुस्लिम युवकांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजवादी पार्टीने बहुजन समाज पक्षाबरोबर आघाडी केली आहे. उत्तर प्रदेशात दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 38 जागा लढवण्याचा फॉर्म्युला मान्य केला आहे. मात्र सपाने दुसरीकडे अमेठी आणि रायबरेली येथे उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेऊन कॉंग्रेसबरोबर देखील हातमिळवणी केली आहे. हे परस्पर विसंगत वर्तन असल्याची टीका मायावती यांनी केली.