पिंपरी/पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलिसांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नववर्षाची खास भेट दिली आहे. पोलीस आयुक्तांनी शहर पोलीस दलातील तब्बल 487 पोलिसांची पदोन्नती केली. आयुक्तांकडून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या अनोख्या गिफ्टमुळे पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आयुक्तांकडून मिळालेल्या पदोन्नतीमध्ये 272 अंमलदारांना पोलीस शिपाई ते पोलीस नाईक, 150 अंमलदारांना पोलीस नाईक ते पोलीस हवालदार, तसेच 65 अंमलदारांना पोलीस हवालदार ते सहायक पोलीस फौजदार असे एकूण 487 अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले की, पोलीस अंमलदार हे पोलीस दलाचा पाया आहेत. ते दिवस-रात्र समाजाच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य बजावत असतात. अशावेळी त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढवल्यास त्यांना अधिकाधिक उत्कृष्ट कर्तव्य बजावता येईल. याच दृष्टीकोनातून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अस्थापनेवरील 487 पोलीस अंमलदारांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे.
पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदारांचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मुख्यालय सुधीर हिरेमठ यांनी अभिनंदन करुन त्यांना पोलीस दलात समाजासाठी उत्कृष्ट काम करुन पोलीस दलाचे नाव उंचवावे असे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.