बहुजननामा ऑनलाईन – आमच्या हाती सत्ता नसतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साताऱ्याचा विकास केला. मात्र राष्ट्रवादीच्या आडमुठेपणामुळे सर्वजण तिथे एकमेकांचे पायच ओढत असतात. असे म्हणत साताऱ्यांचे उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. मुख्यमंत्री आणि मी चांगले मित्र असून आमच्या मैत्रीमुळेच त्यांनी साताऱ्यांच्या विकासाकडे लक्ष दिले. साताऱ्यातील जलमंदिर येथे शुक्रवारी (ता.२३) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मी साताऱ्याच्या विकासासाठी बांधिल असल्याचे सांगितले. तसेच भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे म्हणून मी पक्षांतर करेल असे तर्कवितर्क काढणे चुकीचे आहे. मी माझ्या मतदारसंघाशी प्रामाणिक असून सत्तेसाठी रांगेत उभे राहणे मला पटत नाही. सत्ता असो किंवा नसो जनतेच्या सेवेसाठी मी नेहमीच पुढे असेल, असेही ते म्हणाले. त्यानंतर त्यांना माजी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याबद्दल विचारले असता ते माझे लहान भाऊ आहेत.
आपणच त्यांना मदत केली पाहिजे. ते लहान मुलासारखे आहेत. त्यांनी मांडीवर बसून काही केल तर आपण मांडी तर कापत नाही ना, शिवाय दाढीमिश्या वाढविल्यामुळे छान दिसत असल्याची कोपरखळीही दिली. तर रामराजे यांच्याविषयी विचारले असता रामराजे मला मोठ्या भावासारखे आहेत. ते माझ्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठे आहेत. त्यांची आणि माझी बरोबरी करु नये, त्यांना योग्य वाटेल त्या मार्गांनी ते जातील मला त्यांच्याशी जोडू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.