नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदुंचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास मानसरोवर परिसरात चीनकडून क्षेपणास्त्रांचा तळ उभारण्याचे काम जोरात सुरु आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात सुरु झालेले काम आता पूर्ण झाले आहे. सॅटलाइट फोटोंच्या विश्लेषणांवरुन हे दिसून आले आहे. हिंदुंसाठी धार्मिक दृष्टया कैलास मानसरोवर हे स्थान खूप महत्त्वाचे आहे.
दरवर्षी हिंदू भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी जातात. मोठया प्रमाणावरील लष्करी उपस्थितीमुळे या भागाला आता युद्ध भूमीचे स्वरुप येणार आहे. पूर्व लडाख सीमेवर भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. कैलास मानसरोवरला जाण्यासाठी भारताने लिपूलेख पासपर्यंत 80 किलोमीटरचा रस्ता बांधला आहे. 17 हजार फूट उंचीवर लिपूलेख पास पर्यंत जाणारा हा 80 किमीचा रस्ता बांधल्यामुळे कैलास मानसरोवरला जाण्याचा वेळ वाचणार आहे.
कैलास पर्वत आणि मानसरोवर भागातील ठिकाणे धार्मिक दृष्टया हिंदुंसाठी खूप महत्त्वाची आहेत. एकूणच चीनकडून धार्मिक स्थळाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात लष्करीकरण सुरु आहे. सॅटलाइट फोटोंच्या विश्लेषणावरुन चीनची मानसरोवर भागात जमिनीवरुन हवेत मारा करणारी एचक्यू-9 सॅम मिसाइल सिस्टिम तैनात करण्याची योजना आहे.