नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू असलेल्या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या संदर्भात गंभीर माहिती समोर आली आहे. चिदंबरम यांची विदेशातही संपत्ती असल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडीच्या दिलेल्या माहितेनुसार चिदंबरम आणि या प्रकरणातील अन्य सहआरोपींनी त्यांच्या परदेशात संपत्ती विकून आणि परदेशी बँक खाती बंद करून पुराव्यांची छेडछाड केली आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी ईडीने सुप्रीम कोर्टात केली आहे.
ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे, ‘चिदंबरम यांची बँक खाती अनेक देशांमध्ये आहेत. अर्जेंटिना, ऑस्ट्रीया, ब्रिटीश वर्जिन, आइसलँड, फ्रान्स, ग्रीस, मलेशिया, मोनाको, फिलीपाइन्स,सिंगापूर, द. आफ्रिका, स्पेन, श्रीलंका या १३ देशांत त्यांनी मालमत्ता बनवून बँक खातीही उघडली आहे. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या खात्यांमध्ये देण्या-घेण्याचे व्यवहार झाले आहेत.’
ईडीने चिदंबरम यांच्यावर पुराव्यांशी छेडछाड केल्याचा तसेच साक्षीदारांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करत चिदंबरम यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. ईडीच्या प्रतिज्ञापत्रावरून असे दिसत आहे की, जरी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना सध्या मद्रास हायकोर्टाकडून दिलासा मिळाला असला तरी ईडीचा फास हळूहळू कार्ती यांच्यापर्यंतदेखील पोहोचणार आहे.