बहुजननामा ऑनसाईन – केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना दिलासा दिला असून वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंतर्गत आर्थिक वर्ष २०१७- १८ चा वार्षिक परतावा (रिटर्न) भरण्याची शेवटची मुदत सरकारने ३० नोव्हेंबर पर्यंत वाढविली आहे.
करदात्यांना १ जुलै २०१७ ते ३१ मार्च २०१८ या पर्यंतचा रिटर्न भरण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. यावेळी व्यापाऱ्यांनी रिटर्न भरण्याच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी केली होती. व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीमुळे रिटर्न भरण्याची मुदत ३१ ऑगस्ट वरुन ३० नोव्हेंबरपर्यत वाढविण्यात आली असल्याचे वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांना ३० नोव्हेंबर पर्यंत कधीही रिटर्न भरता येणार आहे. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानसार आर्थिक वर्ष २०१७-१८ चा रिटर्न फॉर्म जीएसटीआर – ९, जीएसटीआर – ९ ए आणि रिकन्सिलेशन स्टेटमेंट चा फॉर्म जीएसटीआर ९सी भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर पर्यत वाढविण्यात आली आहे. असे नमुद करण्यात आले आहे.
वस्तु आणि सेवा कर अंतर्गत सर्व नोंदणीधारक व्यापाऱ्यांना जीएसटीआर -९ द्वारे भरणे आवश्यक असते. यात विविध टॅक्स स्लॅब च्या माध्यमातून खरेदी विक्रीची माहिती दिली जाते. ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल (टर्नओव्हर) दोन कोटींपेक्षा जास्त असते त्यांना जीएसटीआर-९ मधून रिटर्न भरावा लागतो. त्यात जीएसटीआर ९अंतर्गत दिलेल्या वार्षिक विवरणपत्रांचे ऑडिटचा तपशील असतो. परतावा भरण्याची अंतिम मुदत वाढविल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.