मूल (चंद्रपूर) बहुजननामा ऑनलाईन – देशात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत असून चंद्रपूर मधील नागाळा येथे असाच एक अमानुष प्रकार घडलाय याठिकाणी पाच वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मूल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने आज शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.
महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक योगेश समरीत यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. चंद्रपूर तालुक्यातील मौजा नागाळा येथील एका अल्पवयीन मुलीवर त्याच गावातील प्रशांत कनवटे याने २२ जून रोजी अत्याचार केला. त्याच्यावर मूल पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
परंतु अशा घटनांना आळा बसावा म्हणून प्रशासनामार्फत कठोर कारवाई करण्यात यावी,तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, आरोपीला कठोरातील कठोर ,फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि पीडित मुलीला शासनामार्फत मदत करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन येथील नायब तहसीलदार साधनकर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. मूल येथील गांधी चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी चंद्रकांत धोडरे, मंगेश धोडरे, विलास मोगरकार, विनोद बुटले, जितेंद्र इटनकर, कैलास चलाख व शेकडो समाजबांधव उपस्थित होते.