चंदीगड : बहुजननामा – पुढील काही महिन्यात महाराष्ट्रासोबतच इतर अनेक राज्यांत विधानसभा निवडणूक होत आहेत. त्यात हरियाणा राज्यातही निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. आगामी हरियाणा निवडणुकीत कॉंग्रेस आणि बहुजन समाज पार्टी एकत्रितपणे भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चर्चाही सुरू झाली आहे. हरियाणा प्रदेश कॉंग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष कुमारी शैलजा यांनी बसपा सुप्रीमो मायावती यांची भेट घेतली आहे. यासह भूपिंदरसिंग हूडा यांनीही मायावतींची भेट घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि बसपा एकत्र निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हरियाणामध्ये बसपची दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी (जेजेपी) बरोबर युती झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच मायावतींनी जेजेपी सोबतची ही युती समाप्त केली होती. ६ सप्टेंबर रोजी ट्विटरवर याची घोषणा करताना मायावतींनी लिहिले होते कि, बसपा हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि जागावाटपाबाबत जेजेपीची वृत्ती योग्य नव्हती, त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या सूचनेवरून युती तुटलेली आहे. ही युती महिनाभरदेखील चालू शकली नव्हती.
लोकसभा निवडणुका २०१९ पूर्वी मायावतींनी आयएनएलडीशी करार केला होता. पण निवडणुकीच्या अगदी आधी ओम प्रकाश चौटाला यांच्या पक्षाशी युती तोडली होती. नंतर, बसपने राजकुमार सैनी यांच्याशी हातमिळवणी केली, ज्यांनी भाजपपासून विभक्त होऊन नवीन पक्ष स्थापन केला. परंतु निवडणुकीत अपयश मिळाल्यामुळे ही युती जास्त काळ टिकू शकली नाही. त्यामुळे आता मायावती कॉंग्रेस समवेत विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावू शकतात, अशी चर्चा रंगली आहे.
दलित मते ही भाजपाची चिंतेचा भागआहे. कॉंग्रेसने अशोक तंवर यांच्या जागी कुमारी शैलजा यांच्याकडे राज्याची कमिटी सोपविली आहे. राम रहीमविरूद्ध खट्टर सरकारच्या निर्णयामुळेही त्रास होऊ शकतो, कारण राम रहीमचे बहुतेक अनुयायी दलित आहेत. अशा परिस्थितीत मायावतींना आपल्यासोबत आणण्याचा आणि दलित व्होट आपल्याकडे वळविण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे.
बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करता भाजपा नॉन जाट व्होट बँक आपल्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. हुडा, आयएनएलडी आणि दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीमध्ये सध्या जाट्यांची मते विभागली गेली आहेत. त्यामुळे दलित मतावर नियंत्रण ठेवणे ही कॉंग्रेसची रणनीती आहे. हुता यांचा जाट मतावरील पकड आणि मायावतींच्या आगमनाने याचा दलित व्होटवरही परिणाम होईल.