नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीसीडीचे मालक व्हि .जी .सिद्धार्थ सोमवारपासून गुढरीत्या बेपत्ता होते. नुकताच मंगळुरुमधील नेत्रावती नदीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. याशिवाय सिद्धार्थ यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोटदेखील पोलिसांच्या हाती लागली आहे. यात असा उल्लेख आहे. सिद्धार्थ यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे दिसत आहे. सिद्धार्थ यांचा हवाला प्रकरणाशी संबंध होता अशी चर्चा सुरू झाली आहे.
सिद्धार्थ यांच्या काही निकटवर्तीयांनी अशी माहिती दिली आहे की, सुसाईड नोटवर असणारी सिद्धार्थ यांची स्वाक्षरी आणि आयकर विभागाला त्यांनी दिलेल्या वार्षिक अहवालावरील स्वाक्षरी यात फरक आहे. या दोन्हीही सह्या वेगळ्या असल्याचे म्हटले जात आहे. इतकेच नाही तर आता त्यांचे नाव हवाला प्रकरणाशीही जोडले जाण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये असा आरोपही केला आहे की, आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांचा छळ केला आहे. परंतु अधिकाऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
सिंगापूरमधील एका व्यक्तीकडून 1.2 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. यानंतर सिद्धार्थ यांच्यासोबत या सिंगापूरमधील व्यक्तीचे नाव जोडले गेले आहेत. याशिवाय त्या व्यक्तीकडून जप्त करण्यात आलेली रक्कम ही सिद्धार्थ यांचीच आहे असा दावाही त्या व्यक्तीने केला आहे. तपासात त्या व्यक्तीचा मोबाईल चेक केल्यानंतर असे समोर आले आहे की, सिद्धार्थ यांनी त्या व्यक्तीला आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक मेसेज पाठवले आहेत. त्यामुळे आता यावरून सीमेपार होणऱ्या हवाला आर्थिक व्यवहारांमध्ये सिद्धार्थ यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे.