मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुका जवळ येत असताना आघाडीतील अनेक नेते भाजप-शिवसेनेचा झेंडा हाती घेत आहेत. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सामील हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला बोईसर मतदारसंघात खिंडार पडणार आहे असे दिसत आहे.
आगरी सनेचे नेते जनार्दन पाटील आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे शिवसेनेत प्रवेश करणार असून यासाठी ते मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विलास तरे विद्यमान आमदार आहेत. बोईसर मतदारसंघात त्यांची चांगल पकड आहे. याशिवाय आगरी सेनेचे नेते जनार्दन पाटील यांचाही स्थानिक मतदारसंघावर प्रभाव आहे. विधानसभा निडवणुका जवळ येत आहेत. अशात विद्यमान आमदाराच्या पक्ष सोडण्याने बहुजन विकास आघाडीच्या अडचणी वाढतील.
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीला गळती लागली आहे. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. तर अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आघाडीसमोर मोठे आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीने सोडलेल्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचाच असंतुष्ट नेता गळाला लागतो का याची चाचपणी सध्या राष्ट्रवादी नेतृत्त्वाकडून सुरु आहे अशी माहिती समोर आली आहे.