बहुजननामा ऑनलाइन टीम – टी20 क्रिकेटमध्ये कोणालाही न जमलेला पराक्रम वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याने करून दाखवला. 500 बळी टिपणारा ब्राव्हो हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. कॅरेबियन प्रिमियर लीग 2020 च्या सामन्यात ब्राव्होने सेंट ल्युसिया झोक्सचा फलंदाज रखीम कॉर्नवॉलला बाद करत ही कामगिरी केली. ब्राव्होने 549 टी20 सामन्यात 500 बळी घेण्याची किमया साधली.
टी20 क्रिकेटमधील सर्वाधिक बळींच्या यादीत ब्राव्होनंतर दुसर्या स्थानी श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आहे. त्याच्या नावावर 390 बळी आहेत. ड्वेन ब्राव्होने 500 बळी घेण्याचा पराक्रम क्वीन्स पार्क ओव्हल येथे केला. वेस्टइंडिजचा महान गोलदांज कर्टनी वॉल्शने कसोटी क्रिकेटमध्ये 500वा बळीदेखील याच मैदानावर घेतला होता. ब्राव्हो आतापर्यंत जवळपास 21 वेगवेगळ्या संघांकडून टी20 सामने खेळला आहे. त्याने टी20 कारकिर्दीत सर्वाधिक वेळा कायरन पोलार्डला त्याने 9 वेळा बाद केले आहे. टी20 मध्ये 500 बळी घेण्याबरोबरच ब्राव्होने कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये 100 बळीदेखील पूर्ण केले. अशी कामगिरी करणाराही तो एकमेव खेळाडू ठरला.