मुंबई बहुजननामा ऑनलाईन – पुण्यातील गहुंजे येथील बीपीओमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केलेल्या दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. त्यांची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने दिली आहे.
पुण्यातील येरवाडा कारागृहात असलेल्या पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदिप काकडे या दोघांना पुणे सत्र न्यायालयाने १० एप्रिल रोजी वारंट काढत फाशीची तारीख निश्चित केली होती. २४ जून रोजी त्यांना फाशी देण्यात येणार होती. त्यावेळी दोघांनी उच्च न्यायालयाकडे आपल्या फाशीला विलंब झाल्याने आपल्या मुलभूत हक्काचे उल्लंघन झाले असून आपल्यात आता जगण्याची उमेद निर्माण झाली आहे. असा दावा करत उच्च न्यायालयात धाव घेत फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देत दोघांनीही फाशी रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयाला केली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार दया याचिकेवर तीन महिन्यात निर्णय देणे अनिवार्य असताना आमची दया याचिका दोन वर्षे प्रलिंबित होती. त्यामुळे आमच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यास विलंब का झाला याचे स्पष्टीकरणही संबंधित यंत्रणांकडून मागविण्यात यावे आणि तोपर्यंत फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी अशी विनंती त्यांनी केली होती.
त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थिगीती देण्यास राज्य सरकारने विरोध केला होता. त्यानंतर आज उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांची फाशी रद्द केली असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर प्रशासनाकडून फाशीची अंमलबजावणी करण्यात विलंब. पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकडे यांना एकूण ३५ वर्ष जन्मठेप भोगावी लागणार असल्याचे आरोपींचे वकिल युग चौधरी यांनी सांगितले.