बहुजननामा ऑनलाईन – आपण अनेकदा ‘सुपर मून’, ‘ब्लड मून’ तर ‘ब्लू मून’ ऐकलेच असेल तर आता ‘ब्लॅक मून’ ही नवीनच संकल्पनाच समोर आली आहे. देशवासीयांना हा ब्लॅक मून ३० ऑगस्टला पाहता येणार आहे. नक्की हा ब्लॅक मून म्हणजे काय ? अर्थातच काळा चंद्र जो अमावस्येच्या दिवशी दिसून येतो. पण यासाठी महिन्यातील दुसरी अमावस्या असावी लागते. अशात जेव्हा इंग्रजी महिन्यात दोन अमावास्या येतात तेव्हा दुसऱ्या अमावस्येच्या चंद्राला ‘काळा चंद्र’ म्हणण्याचा प्रघात येतो.
जेव्हा १ तारखेला पहिली अमावास्या येते तर दुसरी अमावास्या ही ३० तारखेला येते. या पद्धतीने एका महिन्यात दोन अमावास्या येतात आणि यावेळी ब्लॅक मून पाहायला मिळतो. अगदी याच प्रमाणे एका महिन्यात दोन पौर्णिमाही येतात. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे जर एका महिन्यात दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्लु मून’ असे म्हटले जाते. यावर अमरावती येथील खगोलशास्त्र शाखाप्रमुख रवींद्र खराबे आणि प्रवीण गुल्हाने यांनी असे आवाहन केले आहे की ३० ऑगस्टला उगाचच काळा चंद्र शोधण्याचा प्रयत्न करू नये. कारण अमावास्येला सूर्याचा प्रकाश चंद्राच्या मागे असतो तर त्याची अंधारी बाजू ही पृथ्वीकडे असते.
अलीकडेच ब्लॅक मून म्हणण्याचा प्रघात पडला आहे. तर यापूर्वी ही घटना ३० जुलै २०११, ३० जानेवारी २०१४ आणि ३० जानेवारी २०१६ मध्ये घडली होती. तर यापुढे हा योग ३० मे २०२२ ला येणार आहे. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा मोठ्या प्रमाणात अफवा हे पसरल्या जातात. अशा या घटनेचा मानवी जीवनावर किंवा पृथ्वीवर काहीच परिणाम होत नसतो. ३० ऑगस्ट रोजी चंद्र हा नेहमी सारखा असेल यात काहीच बदल होणार नाही. केवळ सूर्यग्रहणाची स्थिती वगळता, अमावस्येचा कोणताच चंद्र आपणाला दिसत नाही.