नवी दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया आणि मनी लॉड्रिंग घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरु आहे. त्यात भर म्हणजे अजून चार प्रकरणांत चिदंबरम यांच्यावर संशयाची टांगती तलवार आहे. केंद्रीय वित्तमंत्री असताना ‘आयएनएक्स मीडिया’ व ‘एअरसेल मॅक्सिस’ शिवाय आणखी चार कंपन्यांचे परकीय गुंतवणुकीचे प्रस्ताव, कोट्यवधी रुपयांची ‘लाच’ घेऊन परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले. तसेच मिळालेली लाचेची रक्कम विविध बनावट ‘शेल ’ कंपन्या काढून वळविण्यात आली असल्याचा संशय अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) यांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने चिदंबरमआणि त्यांच्या मुलाविरुद्ध सुरु असलेल्या तपासाचा व्याप वाढविण्यात आला आहे.
आतापर्यंतच्या तपासावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘ईडी’मधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, जियाजियो स्कॉटलंड लि., कटारा होल्डिंग्ज, एस्सार स्टील लि. आणि एलफोर्ज लि. या आणखी चार कंपन्यांच्या विदेशी गुंतवणुकीच्या व्यवहारांत गैरप्रकार झाल्याचे दिसते. ‘लाच’ म्हणून दिलेली रक्कम भारतात व विदेशांत नोंदलेल्या ज्या ‘सेल’ कंपन्यांच्या मार्गे वळविण्यात आली त्यापैकी अनेक कंपन्यांमध्ये चिदंबरम व त्यांचे पुत्र कार्ति यांना मिळालेली दिसते.
विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ त्या काळी थेट वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करीत असे, जे आता विसर्जित करण्यात आलेले आहे. कार्ति यांच्या माध्यमातून वित्तमंत्री या नात्याने चिदंबरम यांच्या पदाचा गैरवापर करून गुंतवणुकीच्या या परवानग्या दिल्या गेल्या, असे ‘ईडी’चे म्हणणे आहे. एका ‘शेल’ कंपनीत ३०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली गेल्याच्या नोंदीही तपासात दिसून आल्याचे हि सांगितले जात आहे. ‘ईडी’च्या सूत्रांचे असेही म्हणणे आहे की, चिदंबरम पिता -पुत्रांना मिळालेली रक्कम त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी वापरली. अनेक विदेशी खात्यांमध्ये जमा करण्यासाठी व मलेशिया, ब्रिटन व स्पेनसह अन्य देशांमध्ये स्थावर मालमत्ता खरेदीसाठी करण्यासाठी त्यांनी हि रक्कम वापरली आहे.