नवी दिल्ली वृत्तसंस्था : भाजप नेते तसेच माजी अर्थ आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली यांचे आज दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दुःखद निधन झाले. उद्या दुपारी २ वाजता दिल्लीच्या निगमबोध घाट स्मशानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काही दिवसांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णायलात उपचारासाठी दाखल असलेले जेटली यांनी वयाच्या ६६ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक भाजप नेते , कार्यकर्ते यांनी एम्स रुग्णालयाकडे धाव घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तीन देशांच्या दौऱ्यावर असल्याने दौरा अर्धवट सोडून ते उद्या सकाळपर्यंत दिल्लीत परतणार आहेत.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत म्हंटले कि, ‘ जगातून निघून जाण्याचे त्यांचे वय नाही , माझ्यासारख्या कार्यकर्त्या आणि वकिलाला घडविणाऱ्या या नेत्याचे जाणे फार क्लेशकारक आहे.’ दरम्यान, जेटली यांचे पार्थिव आज त्यांच्या निवास्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. उद्या सकाळी १० ते १ या वेळेत त्यांचे पार्थिव भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात ठेवण्यात येईल, त्यानंतर २ वाजता निगमबोध घाट स्मशानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.