मुंबई : वृत्तसंस्था – भाजपा खासदार रमा देवी यांच्यावर टिप्पणी करणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचं शीर कापलं पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे नेते आफताब अडवाणी यांनी केलं आहे. लोकसभे गुरुवारी तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु होती. यावेळी आझम खान यांनी भाजपा खासदार रमा देवी यांच्यावर टिप्पणी केली. त्यांच्या टिप्पणीनंतर सभागृहात भाजपा खासदारांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. आझम खान यांनी म्हटलं की, “तुम्ही मला इतक्या आवडता की, तुमच्या डोळ्यात डोळे घालून पहात रहावसं वाटतं.” यानंतर गोंधळ सुरु झाला.
आझम खान यांच्या वक्तव्यानंतर भाजपा नेते आफताब अडवाणी म्हणाले की, “आझम खान यांचं वक्तव्य निषेधार्थ आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. भारत सरकारला आमची विनंती आहे की, आझम खान यांचं शीर कापून संसदेच्या दरवाजाला टांगण्यात यावं. जेणेकरून आझम खान आणि ओवेसी सारख्यांना महिलांचा अपमान केल्यास काय परिणाम होतो याची जाणीव होईल.”
पुढे ते म्हणाले की, “महिलांचा अपमान आता सहन नाही केला गेला पाहिजे. आधी जया प्रदा आणि आता भाजपा खासदारावर त्यांनी अशी टिप्पणी केली आहे. हे निषेधार्ह आहे. मी याआधीही म्हटलं आहे की, हा म्हातारा वेडा झाला आहे. पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे यांची हत्या करणं गरजेचं आहे. त्यांच्यापासून आपल्या देशाला आता धोका आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी आझम खान वातावरण बिघडवत असल्याचा आरोप करत ते म्हणाले की, “आझम खान देशातील वातवरण दूषित करत आहेत. त्यांच्यामुळे महिलांना अपमान सहन करावा लागत आहे. त्यांच्या या अशा वक्तव्यांमुळे दिवसेंदिवस महिलांप्रति असणारा आदर कमी होत आहे आणि हे देशसाठी चांगलं नाही.”
नेमकं काय घडलं ?
लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु असताना समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान बोलण्यासाठी उभे राहिले. तू इधर उधर की ना बात कर असं म्हणत त्यांनी बोलायला सुरुवात केली. आझम खान यांनी रमा देवी यांच्यावर टिप्पणी करत म्हटलं की, “तुम्ही मला इतक्या आवडता की, तुमच्या डोळ्यात डोळे घालून पहात रहावंस वाटतं.” रमा देवी यांनी यावर आक्षेप घेतला आणि ही बोलण्याची पद्धत नाही असे सांगितले. यानंतर आझम खान म्हणाले की, “तुम्ही खूप आदरणीय आहात माझ्या बहिणीप्रमाणे आहात.
यानंतर आझम खान यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. परंतु आझम खान यांनी माफी मागण्यास नकार दिला. “मी काही चुकीचे बोललो असेल तर राजीनामा देण्यास तयार आहे” असे ते म्हणाले आणि सभागृहातून बाहेर पडले.