नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोमवारी सोन्याच्या किंमतीत बरेच चढ-उतार दिसून आले. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, सोमवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 44 रुपयांनी घसरून 53,040 रुपये प्रति दहा ग्रॅमवर राहिला. मागील सत्रात सोने 53,084 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते. त्याचप्रमाणे चांदीच्या किंमतींमध्येही लक्षणीय घट झाली. सोमवारी दिल्लीत चांदी 206 रुपयांनी घसरून 68,202 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा बंद भाव 68,408 रुपये प्रति किलोग्रॅमवर राहिला होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, ‘रुपयाच्या मूल्यात वेगाने वाढ झाल्याने दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या स्पॉट किंमतीत मोठ्या प्रमाणात चढ उतार पहायला मिळाली.’ विशेष म्हणजे, सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारात तेजी आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून वाढती गुंतवणूक यामुळे भारतीय चलनात मोठी वाढ झाली. सोमवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 52 पैशांनी वाढून 74.32 रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर पोहोचला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर
सोमवारी जागतिक स्तरावर सोन्याची किंमत प्रति औंस 1,950 डॉलरवर पोहोचली. त्याच वेळी चांदीची किंमत प्रति औंस 26.80 डॉलर होती. तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार आठवड्याच्या पहिल्या व्यापार सत्रात सोन्यामध्ये तेजी दिसून आली आणि स्पॉट किंमत प्रति औंस 1,950 डॉलर पर्यंत पोहोचली.
वायदा बाजारात सोन्याचे दर
स्पॉट मार्केटसह वायदा ट्रेडिंगमध्ये देखील सोन्याच्या किंमतींत घसरणीचा कल सुरूच आहे. सोमवारी संध्याकाळी 05:02 वाजता ऑक्टोबर 2020 रोजी डिलीव्हर होणाऱ्या सोन्याची किंमत 235 रुपये म्हणजेच 0.45 टक्क्यांनी घसरून 51,781 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होती. त्याचप्रमाणे डिसेंबरमध्ये डिलीव्हर होणाऱ्या सोन्याची किंमत 217 रुपये म्हणजेच 0.41 टक्क्यांनी घसरून 51,988 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.
वायदा बाजारात चांदीचे दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सायंकाळी 05:10 वाजता 4 सप्टेंबर 2020 रोजी डिलीव्हर होणाऱ्या चांदीचे दर 617 रुपये म्हणजेच 0.92 टक्क्यांच्या घसरणीसह 66,450 रुपये प्रति किलोग्रॅमवर होता. त्याचप्रमाणे डिसेंबरच्या कॉन्ट्रॅक्ट चांदीचा भाव 653 रुपये म्हणजेच 0.94 टक्क्यांनी घसरून 68,990 रुपये प्रति किलोग्रॅमवर आला.