बहुजननामा ऑनलाईन टीम – सोमवारी सुप्रीम कोर्टात २००२ मधील गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित बिल्कीस बानोला याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी बिल्कीस बानोला ५० लाख रुपये, नोकरी आणि घर देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला दिले आहेत. याआधी बिल्कीस बानोने योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करून केली होती. या मागणीवर बिल्कीस बानोला गुजरात सरकरने ५ लाखांची नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र बिल्कीस बानोने हे स्वीकार केले नाही.
या सर्व आरोपींनी ३ मार्च २००२ रोजी बिल्कीस बानोच्या कुटुंबियांवर हल्ला केला होता. यावेळी बिल्कीसच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली तर बिल्कीसवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणावेळी बिल्कीस पाच महिन्यांची गर्भवती होती. गोध्रा दंगलीनंतर हि सर्व घटना घडली. यावेळी तिच्या घरातील सहा सदस्य मारेकऱ्यांच्या ताब्यातून सुटले.
११ जणांची जन्म ठेपेची शिक्षा कायम
या प्रकरणी सत्र न्यायालयाने ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. यानंतर या ११ आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये त्यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. तसेच या सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी सीबीआयने केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान तीन जणांच्या फाशीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली होती. याप्रकरणी पाच पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरविले होते.
Visit : bahujannama.com