नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. शुक्रवारी दिल्लीत दाखल झालेल्या फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी राज्यातील कोरोना स्थितीसह राजकारणाबाबत त्यांनी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत निवड होणार असल्याची चर्चा असतानाच दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर पाटील यांना स्थान मिळण्याचं निश्चित झालं आहे. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळत आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत आज देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.
दिल्लीत राजकीय खलबतं ?
अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा फडणवीस करत असले तरी या भेटीत कोरोना स्थितीसह राज्यातील राजकारणाबाबत चर्चा झाल्याचे समजतेय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह याच्यात जवळपास 25 मिनीटे चर्चा झाली असून याममध्ये राज्यातील राजकीय घडामोडीवरही खलबतं करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्यातील नवीन कार्यकारणी जाहीर झाली आहे.
या कार्यकारणीतून नाराज असलेल्या नेत्यांना डावलण्यात आले आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या नेत्यांना कार्यकारणीत फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे. तर पंकजा मुडे यांना केंद्रात संधी मिळणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय कार्यकारणीत निवड होत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.