बी.फार्मचा विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, परीक्षेला बसू देण्याची मागणी

December 12, 2020

भद्रावती : बहुजननामा ऑनलाईन – आपल्या मुलाने खुप शिकावं आणि जिवनात सुख-समाधानाने जगावं अशी रास्त अपेक्षा प्रत्येक आई-वडिलांची असते.मात्र,शुल्लक कारणासाठी ‘हत्ती गेलं आणि शेपूट राहीलं’ या म्हणीप्रमाणे केवळ एका परीक्षेमुळे एखाद्या विद्यार्थ्याचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होत असेल,तर त्या विद्यार्थ्याची व पालकाची मानसिक अवस्था कशी असेल याचा विचार करायला लावणारी घटना नुकतीच उजेडात आली आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की,अमोल बालाजी राठोड हा युवक रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी या खेड्यातून चंद्रपूर येथे शिक्षणासाठी आला. त्याने सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात चंद्रपूर शहराजवळील मोरवा येथील हाय टेक काॅलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात बी.फार्म.च्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. चार वर्षांचा अभ्यासक्रम असलेल्या या पदवी परीक्षेत त्याने तीनही वर्षे उत्तीर्ण केली. मात्र अगदी शेवटच्या वर्षाला असतानाच त्याच्या गावाकडे नैसर्गिक चक्रीवादळ आलं आणि या वादळानेच त्याच्या शिक्षणात वादळ निर्माण केलं.

याबाबत एक पत्रपरिषद घेऊन अमोल राठोड याने सांगितले की,दि.२२ मार्च २०२० पासून कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरु झाले. तेव्हापासून महाविद्यालय बंद होते. त्यानंतर दि.२ ते ८ जून पर्यंत महाविद्यालयाकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या काळात मी माझे मुळ गाव शृंगारतळी येथे वास्तव्यास होतो. दि.१६ मे रोजी मी माझी समस्या वर्गशिक्षकांना सांगितली असता त्यांनी मला काळजी करु नकोस,अशा परिस्थितीत कोणाचेही नुकसान केले जाणार नाही. तुझी परीक्षा पुन्हा नियोजित केली जाईल. त्यानंतर त्याच कालावधीमध्ये शृंगारतळी गावामध्ये निसर्ग चक्रीवादळ आले. त्यामुळे माझ्या गावची परिस्थिती बिघडली. परिणामी मला कोणाशीही संपर्क साधता आला नाही आणि मी परीक्षेपासून वंचित राहिलो. त्यानंतर महाविद्यालयाकडून माझी कोणतीही परीक्षा घेण्यात आली नाही. तसेच महाविद्यालयाने मला काही कळविले सुद्धा नाही. माझे महाविद्यालयीन अंतर्गत गुण पाठविण्यात आले नाही. हे निकाल जाहीर झाल्यानंतरच मला कळले. याबाबत महाविद्यालयात विचारपुस केली असता मला समाधानकारक उत्तर मिळाले नाही,असेही अमोलने पत्रपरिषदेत सांगितले.मागील एक महिन्यापासून महाविद्यालय व विद्यापीठ इकडून तिकडे व तिकडून इकडे फिरवित असल्याचे सांगून कोरोनाच्या या काळात माझी राहण्याची अडचण निर्माण झाली आहे.त्यामुळे मला परीक्षेस बसण्याची परवानगी देऊन न्याय द्यावा अन्यथा माझ्या परिवारास काही झाल्यास त्याची जबाबदारी महाविद्यालय व विद्यापीठावर राहील असा इशाराही अमोलने पत्रपरिषदेत दिला.

यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश कोसलगे यांच्याशी संपर्क साधला असता अमोलने दोन्ही परीक्षा दिल्या नाही.कुलगुरुंना माहिती मिळाली आहे.परंतू कायद्यात बसत नसल्याने त्याची परीक्षा होणार नाही. कुलगुरु, मंत्र्यांपर्यंत हे प्रकरण गेले असून विद्यापीठाने महाविद्यालयास पत्र पाठवून त्याची गुणपत्रिका बदलविता येणार नसल्याचे म्हंटले असल्याचे सांगितले.तसेच परीक्षेच्या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षा देऊ शकत नसल्याचे वा नैसर्गिक आपत्ती संदर्भातले कोणत्याही प्रकारचे कागदपत्र अमोलने महाविद्यालयाकडे सादर केले नसल्याचे सांगितले.