बहुजननामा ऑनलाईन – औरंगाबाद मधील धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय मुलीने मोठी बहिण रागावली म्हणून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव शिल्पा रामकुमार धनगावकर असे असून ती आठवी इयत्तेत शिकत होती. औरंगाबाद शहरातील हडको एन- ११ परिसरातील हि घटना आहे. शिल्पा अभ्यास करत नसल्याने तिची मोठी बहिण तिच्यावर रागावली. शिल्पाला मोठ्या बहिणीचं राग सहन न झाल्याने तिने घराजवळील उद्यानातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
बुधवारी रात्री बहीण रागावल्यानंतर शिल्पा रागारागात घराच्या बाहेर पडली. तेव्हा पासून ती बेपत्ता होती. त्यानंतर तिच्या कुटुंबातील व्यक्तींनी तिची शोधाशोध सुरु केली. मात्र त्यांना शिल्पाला शोधण्यात अपयश आले. आज सकाळी हडको परिसरातील बाळासाहेब ठाकरे उद्यानात काही नागरिक मॉर्निंग वॉकला आले असता त्यांनी शिल्पाचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना पाहिला. त्यानंतर तेथील नागरिकांनी याबाबत माहिती अग्निशामक दलाला दिली.
याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी तिथे पोहचले आणि विहिरीतून शिल्पाचा मृतदेह बाहेर काढला. केवळ बहीण रागावली या कारणामुळे शिल्पाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शिल्पाच्या आत्महत्येबद्दल कळताच तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली.
Visit : bahujannama.com