बहुजननामा ऑनलाईन – पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. याचे परिणाम दैंनदिन जीवनावरही होताना दिसत आहेत. याचा प्रत्यय नुकताच मोहरमच्याच दिवशी म्हणजे मंगळवारी (ता.१०) दिसून आला. मोहरच्या दिवशी पाकिस्तानातील बर्याच शहरांमध्ये दुधाची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कराची आणि सिंध प्रांतात लोकांनी मोहरमच्या सणासाठी प्रतिलीटर १४० रुपये किमतीचे दूध विकत घेतले. पाकिस्तानात सध्या दुधापेक्षा पेट्रोल आणि डिझेल स्वस्त मिळत आहेत. कराचीत पेट्रोलचे दर ११३ रुपये प्रतिलीटर तर डिझेलचे दर ९१ रुपये प्रतिलीटर झाले आहे. मोहरम सणामुळे पाकिस्तानात दुधाला प्रचंड मागणी होती.
यादिवशी लोक मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या लोकांना दुधापासून बनविलेले पदार्थ, खीर, सरबत आदी वाटले जातात. मात्र वाढती महागाई आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे तेथील दुधाच्या दराने कळस गाठला आहे. कराचीत लोक सामान्यपणे ९४ रुपये प्रतिलीटरने दुध खरेदी करतात. मात्र कराचीचे आयुक्त इफ्तिखार शालवानी यांनी किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी काहीही केले नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे. गेल्या महिन्यात बकरी ईदच्या निमित्ताने महागाई संदर्भात पाकिस्तानमध्ये बरीच खळबळ उडाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत शेळ्यांची किंमत दुप्पट होती.
आल्याची किंमत ४०० रुपये किलो तर लसणाची किंमत ३२० रुपये किलोने होती.तर हिरवी मिरची १०० रुपये आणि कांदा ५० रुपयांना विकला गेला. ही परिस्थिती पाहता पाकिस्तानमधील सामान्य लोकांचे आयुष्य दिवसेंदिवस बिकट होत चालले आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये ऑगस्टमध्ये महागाई दर सात वर्षांपेक्षा जास्त होता. पाकिस्तानमध्ये महागाईचा आकडा ११ टक्क्यांहून पुढे गेला आहे. तेथील महागाई ११.६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. पाकिस्तानी चलन कमकुवत झाल्यामुळे आणि आयएमएफच्या अटी मान्य केल्यामुळे महागाई वेगाने वाढत आहे. पाकिस्तानच्या सेंट्रल बँकने येत्या काही दिवसांत आणखी महागाईचा अंदाज वर्तविला आहे.