सांगली : बहुजननामा ऑनलाईन – 1 लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर पसार झालेल्या विटा पोलिस ठाण्याचा सहाय्यक पोलिस निरीक्षकाला मंगळवारी (दि. 30) अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रदीप पोपट झालटे (वय 35, रा. मूळ बार्शी, सोलापूर, सध्या रा. विटा) असे अटक केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी पोलिस हवालदार विवेक पांडुरंग यादव व एजंट अकिब फिरोज तांबोळी यांना अटक केली होती. मात्र झालटे पसार झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार खासगी ठिकाणी दिवाणजी म्हणून काम पाहतात. त्यांच्या मालकांविरोधात विटा पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी झालटे व यादव यांनी तक्रारदाराकडे दीड लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी विटा पोलिस ठाणे परिसरात सापळा रचून 1 लाख रुपये लाच घेताना यादव आणि तांबोळी या दोघांना अटक केली होती. मात्र कारवाईनंतर झालटे हा पसार झाला होता. तो मंगळवारी पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.