सातारा : बहुजननामा ऑनलाईन – एका पोलीस बॉयने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आल्याने जगतापवाडी (ता.कोरेगाव) परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. 30) सकाळी 10 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्याचे वडिल सातारा पोलिस दलात सहायक फौजदार पदावर कार्यरत आहेत.
किरण धनाजी भोसले (वय 26, रा. सुर्ली ता. कोरेगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडिल सहायक फौजदार धनाजी भोसले यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनाजी भोसले यांनी मंगळवारी सकाळी जगतापवाडी य़ेथे राहणारा आपला मुलगा किरण याला फोन लावला. मात्र त्याने तो फोन उचलला नाही. त्यामुळे भोसले यांनी त्यांच्या एका सहकार्याला फोन करून मुलाकडे जाण्यास सांगितले. त्यानुसार त्या मित्राने घरी जावून पाहिले असता किरणने गळफास घेतल्याचे दिसून आले.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर धनाजी भोसले यांनी तातडीने जगतापवाडी येथे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलीसांनी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला. दरम्यान किरण यांचा विवाह झाला असून त्यांना दोन लहान मुले आहेत. पोलिस तपास सहाय्यक फौजदार मच्छिंद्र जाधव तपास करत आहेत.