..अन् यांना रक्ताची ‘खुशबू’ येतीये; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला पंतप्रधान मोदीच जबाबदार : असदुद्दीन ओवैसी
हैदराबाद : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असताना रुग्णसंख्येतही वेगाने वाढ होत आहे. मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावरून आता एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘देशात कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर जाण्यास केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत’, असे ओवैसी म्हणाले.
भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. आरोग्य यंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. परिणामी अनेक रुग्ण उपचाराविना दगावत आहेत. त्यावरून असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी रुग्णालयांतील सुविधा का वाढविल्या नाहीत? केंद्र सरकार तेव्हापासून झोपले होते का? देशाच्या राजधानीत ऑक्सिजन का कमी पडतोय? आपण आत्मनिर्भर भारत आहोत, तर सौदी अरेबिया, रशिया आणि इतर देशांची मदत का घेत आहोत. मृतांचे दफन केले जात आहे. शव जाळले जात आहेत आणि यांना (मोदी सरकारला) रक्ताची खुशबू (सुगंध) येत आहे’.
तसेच आमच्याकडे खासदार फंड असता तर आम्हाला लोकांना ऑक्सिजन अथवा औषधी देता आली असती. मात्र, आता काहीही नाही. मोदी सरकार अदृश्य झाले आहे. आपण गेल्या वर्षी लोकांना थाळ्या आणि टाळ्या वाजवायला सांगितले होते, त्याने काय झाले? देशातून कोरोना पळाला का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याशिवाय देशात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. असे असतानाही पंतप्रधानांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये केवळ एकदाच ऑक्सिजनचा उल्लेख का केला?, असे ते म्हणाले.
Comments are closed.