नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगलने त्यांच्या ‘प्ले स्टोअर’वरून लोकप्रिय मेसेजिंग ‘ToTok’ हे ऍप काढून टाकले असून संयुक्त अरब अमीरात सरकारद्वारे याचा वापर युजर्सवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता, त्यामुळे हे पाऊल उचलले असल्याचे समजते. हे ऍप ‘ऍपल प्ले’ स्टोअर आणि ‘गूगल प्ले’ स्टोअरवरून हटवण्यात आले असून ज्यांच्या मोबाईलमध्ये हे ऍप होते, त्यांची माहिती ट्रॅक केली जात होती.
9to5Google च्या एका अहवालानुसार गुगलने आपल्या प्ले स्टोरमधून हे अॅप हटवले असून अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते या अॅपचे मिडल ईस्ट, अशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेत अनेक डाऊनलोडर आहेत. अॅप रँकिंग आणि App Annie च्या मते मागील आठवड्यात हे अॅप अमेरिकेत सर्वात जास्तवेळा डाऊनलोड केले गेले होते.
न्यूयॉर्कमधील एका फर्मच्या तपासानुसार हे ऍप बनवणारी कंपनी Breej Holding असल्याचे समजले आहे. तसेच ही कंपनी DarkMatter सोबत मिळून काम करत असल्याचेही अहवालानुसार समोर आले आहे. DarkMatter ही अबुधाबी येथील एक सायबर इंटेलिजेंस आणि हॅकिंग फर्म असून ती पहिल्यापासूनच सायबर क्राइममुळे FBI च्या चौकशीमध्ये अडकली आहे.
याअगोदर समोर आलेल्या अहवालात Google ने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन १.९ बिलियन अॅप्स हटवले असून २०१९ मध्ये गुगलने १९० कोटीपेक्षा जास्त मालवेअर अॅप्स हटवले होते, असे म्हटले आहे. तसेच या प्रकारचे अॅप नॉन गुगल अॅप स्टोअरवर, ऑनलाइन गेम्बलिंग आणि वेबसाइटद्वारे इंस्टॉल केले जातात.