लखनऊ : वृत्तसंस्था – चीनच्या वुहान शहरातील लोकांचा जीव संकटात टाकणार्या कोरोना वायरसमुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. राजधानीमधील उपचार केंद्रांमध्ये यासाठी वेगळे वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. विमान तळावरसुद्धा प्रवाशांची स्क्रीनिंग केल्यानंतर त्यांना शहरात प्रवेश दिला जात आहे. चीनच्या वुहान शहरात 62 रूग्णांमध्ये हा वायरस आढळला आहे. दोन दिवसांपूर्वी एका भारतीय शिक्षिकेला सुद्धा कोरोना वायरसची लागण झाली होती. याची माहिती मिळताच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब आरोग्य कल्याण मंत्रालयाच्या सचिव प्रीती सूदन यांनी अलर्ट जारी केला आहे. त्यांनी आरोग्य अधिकार्यांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सचिवांकडून पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, चीनहून येणार्या प्रवाशांचे पूर्णपणे स्क्रीनिंग करण्यात यावे. सीएमओ डॉ. नरेंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, राजधानीच्या उपचार केंद्रांसह सरकारी रूग्णालयांना अलर्ट करण्यात आले आहे. रूग्णांना आयसोलेट करण्यासाठी वेगळे वॉर्ड तयार करण्यात आले आहेत.
विमानतळांवर विशेष खबरदारी
सीएमओने सांगितले की, चीनहून येणार्या प्रवाशांची जास्त काळजी घेतली जाईल. त्यांची विमानतळावर थर्मल स्कॅनर टीम स्क्रीनिंग करेल. या तपासणीत प्रवाशामध्ये आजाराची लक्षणे आढळल्यास रूग्णवाहिकेतून त्यास केजीएमयू किंवा पीजीआयमध्ये पाठवण्यात येईल.
केजीएमयूमध्ये 10 तर पीजीआयमध्ये 5 बेड रिझर्व्ह
यासाठी केजीएमयूमध्ये 10, पीजीआयमध्ये 5 आणि लोहिया संस्थेत 5 बेड आरक्षित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याप्रमाणे सिव्हिल, बलरामपुर, लोकबंधु रूग्णालयांनाही अलर्ट करण्यात आले आहे.
चीनी वायरस नोव्हेल कोरोना
एनसीओव्हीमुळे जागतिक आरोग्य संघटनेने अलर्ट जारी केला आहे. या वायरसमुळे सीवियर अॅक्युट रेस्पायरेटरी सिंड्रोम (एसएआरएस) होतो. यामध्ये फुफ्फुसांना गंभीर प्रकारचा संसर्ग होतो. रूग्नाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. चीन आणि हाँगकाँगमध्ये 2002- 2003 मध्ये यामुळे अनेक लोकांचे जीव गेले होते. यावर्षी सुद्धा चीनच्या वुहान शहरात सुमारे 62 रूग्णांमध्ये हा वायरस आढळून आला आहे. हा वायरस सी-फूडमध्ये आढळतो. उंट, मांजर आणि वटवाघूळमध्येही तो आढळतो.
ही आहेत लक्षणे
जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना वायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला थंडीताप, सर्दी, खोकला, गळ्यात दुखणे, श्वास घेण्यास अडचण आदी समस्या जाणवतात. तीन दिवसांनंतर निमोनियासारखी लक्षणे दिसतात. याचा परिणाम किडनीवरही होतो.
असा करा बचाव
केजीएमयू मायक्रोबायोलॉजी विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. शीतल वर्मा यांनी सांगितले की, राजधानीमध्ये आतापर्यंत याचे रूग्ण सापडलेले नाहीत. यापासून वाचण्यासाठी स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले पाहिजे. थंडीताप असणार्या लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हात साबणाने स्वच्छ धुवावेत. नाक आणि तोंडावर मास्क किंवा रूमाल बांधावा. जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर तिची भांडी अन्य लोकांनी वापरू नये. तापासह छातीत दुखत असल्यास डॉक्टरांकडे जा. समुद्रातील मासे खाऊ नका.
Visit : bahujannama.com