नवी दिल्ली : वृत्तसंस्था –जम्मू-काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांसोबत पकडण्यात आलेला पोलीस अधिकारी दविंदर सिंहची राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (एनआयए) सतत चौकशी करत आहे. यादरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दविंदरने दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी तीन वेगवेगळी घरे घेतली होती. यासाठी बुधवारी श्रीनगरच्या अनेक भागात छापेमारी करण्यात आली. एनआयएचे वरिष्ठ अधिकारी आज श्रीनगरहून दिल्लीला परतले आहेत. परंतु, एनआयएची पाच सदस्यांची टीम अजूनही श्रीनगरमध्ये तपासासाठी थांबणार आहे. दविंदरलाही अजून दिल्लीला नेण्यात आलेले नाही.
दहशतवाद्यांचे ठिकाण
सूत्रांच्या माहितीनुसार दविंदरने आपल्या श्रीनगरमधील इंदिरानगरच्या घरात दहशतवाद्यांची राहण्याची व्यवस्था केली होती, शिवाय चानपोरा आणि सनत नगर भागातही त्याने त्यांची व्यवस्था केली होती. त्याच्यावर आरोप आहे की ही घरे निर्दोष लोकांना दहशतवादात फसवूण त्यांच्याकडून घेतलेल्या पैशातून बनविण्यात आली आहेत. याशिवाय दविंदर दहशतवाद्यांना लपवण्यासाठी गुलशन नगरमध्ये एका डॉक्टरच्या घराचाही वापर करत होता. याच ठिकाणी त्याने हिजबुल कमांडर नवीदसह अनेक दहशतवाद्यांना आश्रय दिला होता.
अमूल बटरच्या ट्रकची चोरी
सूत्रांनी अशीही माहिती दिली की, 1997 मध्ये दविंदरने अमूल बटरचा एक ट्रक चोरला होता. हा ट्रक तत्कालीन जम्मू-काश्मीरचे उप मुख्यमंत्री गुलाम मोहिदिन शाह यांच्या कुटुंबाचा होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. परंतु, त्यावेळी डीएसपी दविंदर सिंहचा बॉस असलेल्या एका अधिकार्याने त्याला वाचवले होते.
28 वर्षांपूवी झाला होता सस्पेंड
दविंदर सिंहशी संबंधित अनेक खुलासे सध्या होत आहेत. 1992मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये ट्रकमध्ये ड्रग्स जप्त करण्यात आले होते, शिवाय एक तस्करालाही अटक करण्यात आली होती. आरोप आहे की, नंतर पैसे घेऊन दविंदरने प्रकरण दाबून टाकले आणि ड्रग्ज विकले. या प्रकरणाची चौकशी झाली आणि दविंदरला सस्पेंड करण्यात आले होते. नंतर त्याने माफी मागितली आणि पुन्हा सुरूवात केली.
Visit : bahujannama.com