‘मी 67 मधील बाळासाहेबांचा सैनिक’, जेष्ठ शिवसैनिकाचा ‘मनसे’ आशीर्वाद, कॉल रेकॉर्डिंग झालं ‘व्हायरल’ ( ऑडिओ क्लिप )

raj-Thackery

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहुर्त साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पक्षाचे पहिले महाअधिवेशन मुंबईतील गोरेगावच्या नेस्को मैदानात आयोजित केले आहे. मनसेचा नवा झेंडा, त्यामधील निळा आणि हिरवा रंग काढून त्याऐवजी निवडलेला नवा भगवा रंग, त्यावरील राजमुद्रा आणि राज ठाकरे आज कोणती भूमिका मांडणार, अशा विविध कारणांमुळे हे अधिवेशन खुपच चर्चेत आहे. मात्र यानिमित्ताने आणखी एका गोष्टीची चर्चा होत आहे ती म्हणजे राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेवर एका ज्येष्ठ शिवसैनिकाने दिलेल्या मनसे आशीवार्दाची. या आशीर्वादाची रेकॉर्ड सध्या चर्चेत आहे.

मनसेच्या बदललेल्या धोरणामुळे एका ज्येष्ठ शिवसैनिकानेही मनसेला आशीर्वाद दिला आहे. मनसेच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील यांना ज्येष्ठ शिवसैनिकाने कॉल करुन म्हटले की, तुम्ही मांडलेली भूमिका योग्य आहे. त्यासाठी तुमचं कौतुक. मी 67 मधील बाळासाहेबांचा सैनिक आहे. पूर्वी आम्ही मोरारजींची गाडी अडवायला जायचो पण आता अंगात शक्ती राहिलेली नाही. आत्ताचे लोक विचारांशी ठाम नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी ठाम होतो. रस्त्यावर उतरुन संघर्ष करणं जमलं पाहिजे. दरम्यान या संवादाचे रेकॉर्डिंग मनसेने ट्विटरवर पोस्ट केले आहे.

मनसेने ऑडिओ रेकॉर्डिंग ट्विट करताना म्हटले आहे की, खरं तर दोन व्यक्तींमधील खासगी संभाषण जाहीर करू नये, असा संकेत असतो पण त्या संभाषणाला जर आशीर्वादाची, सदिच्छांची किनार असेल तर कधी संकेतभंग करायला देखील हरकत नाही. हे ज्येष्ठ शिवसैनिक अनामिक आहेत, पण आम्हाला ते वंदनीय आहेत.

आज सायंकाळी राज ठाकरेंची सभा
मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नवीन झेंड्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर विविध विषयांवर ठराव मांडले जातील. संध्याकाळी 6 च्या सुमारास राज ठाकरेंचे भाषण होणार असून राज ठाकरे यावेळी नेमकी कोणती भूमिका मांडणार हे स्पष्ट होईल. या महाअधिवेशनासाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबईत आले आहेत. मुंबईत या अधिवेशनाच्या निमित्ताने लागलेले पोस्टर हे मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या दिशेने जाणार असल्याचे संकेत देत आहेत. विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा अशा आशयाचे हे पोस्टर्स आहेत.

झेंड्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध
मनसे आजपासून जुना झेंडा बदलून नवीन भगव्या रंगाचा झेंडा हाती घेणार आहे. या झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा दर्शवली आहे. परंतु, या राजमुद्रेला संभाजी ब्रिगेड आणि काही शिवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. मनसेच्या पूर्वीच्या झेंड्यातील निळा आणि हिरवा रंग जाऊन त्यांची जागा आता भगव्या रंगाने घेतली आहे.

Visit : bahujannama.com