बहुजननामा ऑनलाइन टीम – दत्तात्रय भरणे मामा मंत्री झाले तरी ते जॅकेट कधी घालतात का.? मी कधी जॅकेट घातलेलं दिसतंय का ? असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री आणि भाजप नते हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता लगावला. इंदापूरचा दूध संघ कधीच बंद पडला. तुम्हाला दूध संघ चालवता येत नाही, बॅंक चालवता येत नाही, काय करता काय, असा सवाल पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच इंदापूर तालुक्याच्या दौ-यावर आहेत. पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुतन इमारतीचे उद्धघाटन करण्यात आले. यावेळी इंदापूरचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. पवारांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडी सरकार, कोरोना, इंदापूर, जीएसटी आदीवर भाष्यं केले.
कोरोना संकटामुळे मध्यंतरी जाहीर कार्य़क्रम घेता आले नाहीत. कोरोनामुळे मोठे नुकसान झाले असून अनेकांना जीव गमावावा लागला. आता कोरोना कमी होत असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना झाला. काळजी घ्या इथे कुणीच मास्क लावलेला दिसत नाही. कोरोना कुणालाच सोडत नाही. ना दादाला ना मामाला. दादालाही कोरोनाने कुणालाही सोडले नाही, अशी टोलेबाजी पवार यांनी केली. सामान्य व्यक्तीला मदत व्हावी या हेतूने जिल्हा बँक चालवत आहोत. अनेकजण नोकरीसाठी येतात पण गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल. साडेतीन लाख कोटी रुपयांमध्ये राज्य चालवायचे आहे. दिड लाख कोटी रुपये पगारासाठी जातात उर्वरीत दोन लाख कोटी रुपयात सर्व विभागांना निधी द्यावा लागतो, असे ते म्हणाले.
मामा मंत्री म्हणून नवखा, पण…
अजित पवार यांनी तुमच्या दत्तात्रय भरणेंना मंत्री केल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम खात त्यांच्याकडे. रस्त्याची सगळी कामे पठ्ठ्याकडेच, अशोकराव चव्हाणही त्यांना मदत करतात. सामान्य प्रशासन विभाग जे खात मुख्यमंत्री ठेवतात त्याच राज्यमंत्रीपद भरणे यांना दिले आहे. मामा मंत्री म्हणून नवखा आहे.पण, पाठपुरावा करायला चिकट आहे, असे पवार म्हणाले.