बहुजननामा ऑनलाईन – राज्याच्या राजकारणात काका अजित पवार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. त्यांच्यातील राजकीय शीतयुद्ध सर्वांच्याच परिचयाचे आहे. येत्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रेला सुरवात केली. राज्यभरात शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि अजित पवार हे ठिकठिकाणी मतदांराच्या गाठीभेटी घेत आहेत. तसेच विद्यमान सरकारवर टिका देखील करत आहेत.
दरम्यान ही यात्रा कर्जत जामखेड मतदार संघाच पोहचली. या मतदार संघातून रोहित पवार इच्छुक असून त्यांनी मतदारसंघात निवडणूकीची चांगलीच तयारी करुन ठेवली आहे. मात्र शिवस्वराज्य यात्रा कर्जत जामखेड मध्ये पोहचताच रोहित यांचे काका अजित पवार यात्रेत दिसले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळासह कर्जत जामखेड मतदार संघातही चर्चा होत आहेत.
याच मतदार संघातून अजित पवार यांचे मित्र राजेश गुंड यांच्या पत्नी मंजूषा गुंड देखील इच्छुक आहेत. मात्र गुंड यांची उमेदवारी रद्द करुन रोहित पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या चर्चा मतदार संघात होत आहेत. त्यात अजित पवार आणि त्यांचे सहकारी धनंजय मुंडे देखील यात्रेत न दिसल्याने रोहित पवार यांच्या उमेदवारीवर त्यांची नाराजी असल्याची चर्चा मतदार संघात होताना दिसत आहेत.