अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – अकोले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावरती विरोधकांनी ‘ओली पार्टी’ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर डॉ. लहामटे यांनी आपण दारु पित नाही, मांसाहार करीत होतो, तोही आजपासून बंद करीत आहोत, अशी घोषणाच विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना केली आहे.
अकोल्यात कोरोना संसर्गाच्या काळात आमदार डॉ. लहामटे यांच्या उपस्थितीत एका कथित पार्टीची चर्चा सगळीकडे सुरु आहे. तसेच या पार्टीत एक कोरोना संसर्गित व्यक्ती असल्याचा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केला. मग या घटनेची तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली. त्यानंतर आमदार डॉ. लहामटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली. आपण पूर्वी मांसाहार करत नव्हतो, पण आरोप करणाऱ्यांच्या सोबतीत असल्याने मांसाहार करायला शिकलो, असा टोला सुद्धा हाणला. त्यावर भांगरे यांनी प्रश्न मांसाहार करण्याचा नाही, कंटेन्मेंट झोनमध्ये लोकप्रतिनिधीनेच पार्टी करुन नियम मोडल्याचा आहे, असं म्हटलं.
आमदार डॉ. लहामटे यांनी सांगितलं की, मित्रांच्या आग्रहामुळे मांसाहार करण्यासाठी गेलो होतो. पण, विरोधकांनी आरोप करताना दारु पार्टीचा उल्लेख केला. आपण दारु पित नाही. मांसाहार करत होतो, मात्र आता तोदेखील बंद करत आहे. काही काळासाठी मांसाहार बंद केला होता. पण, भाजपामध्ये असताना आता आरोप करणाऱ्या नेत्यांनीच आपणास पुन्हा मांसाहार करायला शिकविले. तसेच पार्टीत जो मित्र कोरोना संसर्गित असल्याचा उल्लेख करण्यात येत होता. त्याच्यासोबत आपला संपर्क आला नाही. त्यानंतर आपण स्वतः चाचणी करुन घेतली. आणि अहवाल निगेटिव्ह आला आहे. तरी सुद्धा सरकारी नियम मोडला गेला असेल तर कारवाईला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचं डॉ. लहामटे म्हणाले.