बहुजननामा ऑनलाइन टीम – मुलाला पोलीस दलात नोकरी मिळवून देतो, असे सांगून महिलेची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला समर्थ पोलिसांनी( police officer) अटक केली आहे.
सुरेश ईश्वर पेंडणेकर (वय ३६, रा. भांडुप, मुंबई) असे या तोतयाचे नाव आहे. याप्रकरणी जया राजू पंडित (वय ४२, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश पेंडणेकर याने फिर्यादी यांना आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यांच्या मुलाला पोलीस दलात नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याकडून गेल्या दीड वर्षात वेळोवेळी ८० हजार रुपये घेतले. तरीही त्याला नोकरी लावली नाही. तेव्हा फिर्यादी यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांच्या खात्यात १२ हजार रुपये परत केले. मात्र, उरलेले ६८ हजार रुपये परत देण्यास टाळाटाळ केली. तेव्हा त्यांनी समर्थ पोलिसांकडे तक्रार केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु तान्हाणे यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. पेंडणेकर हा जुन्या जिल्हा परिषदेजवळील संजीवनी हॉटेलजवळ असल्याची माहिती मिळाल्यावर सोमवारी सायंकाळी त्याला पोलिसांनी पकडले. त्याने आणखी कोणाला अशा प्रकारे फसविले आहे का, याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे करीत आहेत.