मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – नोकरी देण्याच्या बहाण्याने मुलाखतीसाठी बोलवून एमबीए झालेल्या एका २८ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी दिल्लीच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. साहिलसिंग अरोरा असे आरोपीचे नाव आहे. त्याने एका खासगी बँकेत एचआरची नोकरी देण्याचे आमिष दाखवून पीडित युवतीला जुहूच्या हॉटेलमध्ये बलात्कार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवती ही उत्तर प्रदेशमधील रहिवासीआहे , गेल्या वर्षी एका खासगी कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर ती मुंबईत आली होती, तेव्हा पासून ती नवी मुंबईत राहत होती. काही महिन्यांनंतर तिने नोकरी सोडली आणि ती उत्तर प्रदेशात पुन्हा परत आली. त्यानंतर नोकरीच्या शोधात ही तरुणी एप्रिल महिन्यात पुन्हा मुंबईत आली. त्यानंतर जुलैमध्ये तिला आरोपी अरोराचा नोकरीसाठी फोन आला. आरोपीने तिला आपला दुसरा मोबाइल क्रमांक देत एका खासगी बँकेत एचआरची नोकरी उपलब्ध असून आपण या खासगी बँकेत टॉप मॅनेजमेंट टीममध्ये असल्याचेही तिला सांगितले.
तसेच महिन्याला ३० हजार रुपये पगार मिळेल असे आश्वासनही त्याने तिला दिले. त्यानंतर अरोराने तिला १९ सप्टेंबरला फोन करून सर्व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी जुहूमधील एका हॉटेलात बोलविले. ही युवती हॉटेलच्या रुममध्ये पोहोचताच आरोपीने रुमचा दरवाजा लॉक केला आणि तिच्यावर बलात्कार केला. याला विरोध करत तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र आरडाओरड केल्यास याचे गंभीर परिणाम होतील अशी धमकी देत त्याने तिला गप्प केले. आरोपीने थेट दुसऱ्या दिवशी तरुणीला धमकी देत हॉटेलच्या रुममधून बाहेर जाण्याची परवानगी दिली. तसेच तक्रार केल्यास युवतीसोबतचा अश्लील व्हिडिओ तुझ्या वडिलांना पाठवेल, अशी धमकीही त्याने तिला दिली. मात्र, युवतीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Visit : bahujannama.com