बहुजननामा ऑनलाईन – अंबानी स्फोटकं प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी वाझे आणि युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांचे संबंध होते. दोघांच्या मोबाईलवरील संभाषणाची एनआयएने चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्या आरोपाला उत्तर देताना सरदेसाईनी राणे कुटुंबियांची पार्श्वभूमी सांगत टीका केली होती. त्यानंतर राणेंनी सरदेसाई यांचा व्हिडीओ ट्विट करत लग्नासाठी पत्रकार परिषद घेतल्याचा टोला लगावला आहे. डियर शादी डॉट कॉम, हा तरुण लग्नासाठी मुलगी शोधत आहे. त्यामुळेच त्याने आपली व कुटुंबियांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, त्याला मुलगी शोधण्यासाठी मदत करा, असा टोला लगावला आहे.
राणे यांनी ट्विटबरोबरच पत्रकार परिषदेतूनही सरदेसाईंवर टीका केली आहे. लग्नासाठी मुलगी शोधायची, तर शादी डॉट कॉमवर शोधायची, त्यासाठी पत्रकार परिषद घ्यायची काय गरज? असे राणे यांनी म्हटले आहे. वाझे प्रकरणाबाबत सरदेसाईंनी अवाक्षरही काढले नाही. मी बोललो ते खर की खोट याबाबत देखील त्यांनी काही बोलले नाही. मग पत्रकार परिषद फक्त सुक्या धमक्या देण्यासाठी घेतली होती का अशी विचारणाही त्यांनी केली आहे. सरदेसाई यांच्या न्यायालयात खेचण्याच्या इशाऱ्याला उत्तर देताना आपणही शिवसेनेची प्रकरण बाहेर काढू, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.