Raj Thackeray | जाती-पातीवरून द्वेष पसरवणाऱ्यांना दूर ठेवा; राज ठाकरेंचा निशाणा कोणावर?

June 24, 2024

मुंबई : Raj Thackeray | राज्यात मराठा (Maratha Samaj) आणि ओबीसी समाज (OBC Samaj) आमने-सामने आले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार अडचणीत सापडल्याचे बोलले जात आहे. एकीकडे मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करीत आहे तर दुसरीकडे ओबीसी नेते आपल्या कोट्यातील इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये म्हणून मागच्या काही दिवसांपासून उपोषण करीत होते. त्यावरून या दोन समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान राज्यातल्या या परिस्थितीवर राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आमची बैठक होती. त्याबाबत नेत्यांना आदेश देण्यात आले आहेत. सध्या समाजात जातीचं विष पसरवलं जात आहे. जाती-पातीतून काहीही होणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

जातीपातीच्या नावावर राजकीय नेते द्वेष पसरवतील अन् मतं मागतील आणि भोळसटपणे हे लोक मत देतील. पण, पुढच्या येणाऱ्या पिढ्या यांच्या मनामध्ये जात विषय भिनत आहे. शाळा- कॉलेजपर्यंत हा विषय गेला आहे. लहान मुलं जाती विषयी बोलत आहेत. जातीपातीवरून जे द्वेश पसरवणारे नेते आहेत. त्यांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे, असं राज म्हणाले.

आवडता पक्ष असो किंवा आवडता नेता असो अशा प्रकारचा द्वेष पसरवला जाणार असेल तर महाराष्ट्राचे काय होईल. उत्तर प्रदेश , बिहारमध्ये जे सुरु आहे ते उद्या राज्यात सुरु होईल. खून-खराबे सुरु होतील असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.