सातारा : बहुजननामा ऑनलाईन – ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 8 लाख 40 हजारांची खंडणी उकळल्या प्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. चंद्रकांत दादासो साठे उर्फ बाळू साठे (वय 35 रा शाहू बोर्डिंगजवळ, व्यंकटपुरा पेठ, सातारा) असं अटक झालेल्याचं नाव आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरराव गुलाबराव निंबाळकर (वय 52 रा गडकर आळी शाहूपुरी, सातारा) हे 2015 पासून कोटेश्वर मंदिरात भजनासाठी जातात. इथंच बाळू साठे हा ढोलकी वाजवण्यासाठी येत असे. इथं दोघांची ओळख झाली होती. 2018 मध्ये साठेनं निबाळकरांना भाजी विक्रीच्या व्यवसायासाठी 3 लाख मागितले. परंतु निंबाळकरांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. यावर साठेनं जर पैसे दिले नाही तर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली. यानंतर भीतीपोटी निंबाळकरांनी साठेला रोख स्वरूपात 3 लाख रुपये दिले.
यानंतर वेळोवेळी साठेनं निंबाळकरांना ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याची आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. इतकंच नाही तर साठेनं कोल्हापूरमधील करवीर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे आणि तो माघारी घ्यायचा आहे अशी खोटी माहिती देऊन निंबाळकर यांच्याकडे पैशाची मागणी केली. निंबाळकरांची सामाजिक पत धोक्यात आणण्याची भीती घालून साठेनं त्यांच्याकडून एकूण 8 लाख हजार रुपये रोख स्वरूपात घेतले.
शुक्रवारी (दि 4 सप्टेंबर रोजी) साठेनं पुन्हा एकदा निंबाळकरांकडे 2 लाखांची मागणी केली. यानंतर या प्रकरणाला कंटाळून निंबाळकरांनी अखेर शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि यासंदर्भात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी बाळू साठेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. साठेला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, मोहन पवार, पंकज मोहिते, सुनिल मोहरे यांनी संशयित आरोपी बाळू साठे याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.