रांची बहुजननामा ऑनलाईन – मुलगा आणि सुनेच्या मृत्यूनंतर अवघ्या काही महिन्यांच्या नातवाची जबाबादारी आली. आपल्या नातवाच्या दुधाचा खर्च भागविण्यासाठी ८० वर्षाच्या आजीने तिच्या मालकीची जमीन विकल्याचा प्रकार झारखंडमधील गुमला येथे उघडकिस आला आहे. तिचा नातू वाचल्याने तिला आनंद झाल्याचे आजी सांगते. कलारा कल्लू असे या ८० वर्षाच्या महिलेचे नाव आहे.
मुलाचे आणि सुनेचे निधन
राहीगड पोलीस स्थानक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सनियोका गावची ही रहिवाशी आहे. काही महिन्यांपुर्वी तिच्या मुलाचे निधन झाले. त्यावेळी तिची सून गरोदर होती. परंतु प्रसुतीवेळी तिचाही मृत्यू झाला. मुलगा आणि सुनेचे निधन झाल्याने घर चालविण्याचे आणि उत्पन्नाचे साधन उरले नाही. उलट नातवाचीदेखील जबाबदारी तिच्यावर आली.
नातवासाठी जमीनीचा तुकडा विकला
कलारा यांनी नातवाची जबाबदारी आल्यानंतर त्यांच्याकडे उत्पन्नाचे काही साधन उरले नाही. त्यांचा नातू कुपोषण केंद्रात आहे. कलारा यांनी कुपोषित परिस्थितीत त्याला तेथे दाखल केले. परंतु त्याच्या उपचाराचा खर्च करणेही शक्य नसल्याने कलारा यांनी आपल्या नावावर असलेल्या जमीनीचा तुकडा विकला. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्याचा खर्च करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना कलारा म्हणाल्या, मी जमीन विकून नातवाचा खर्च भागवत आहे. भविष्यात कोणी मदत केल्यास खुप बरं होईल. मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे माझ्या नातवाला कोण सांभाळेल याची चिंता आहे.
कलारा यांनी नातवाला रुग्णालयात आणले तेव्हा त्याची प्रकृती खुप नाजूक होती. परंतु आता त्याची तब्येत सुधारली आहे. असं रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर त्याचे पालन पोषण बाल कल्याण समिती करणार असल्याचे समोर आले आहे.